Type Here to Get Search Results !

कायदे बनवणाऱ्या विधीमंडळातच नियमांची पायमल्ली आमदारच नाही तर मंत्र्यांनीही दिले विनापास व्यक्तींना प्रवेश


 विधीमंडळाच्या कामकाजात शिस्त आणि सुरक्षिततेचे पालन करण्यासाठी काटेकोर नियम घालून दिले असतानाही स्वतः सदस्यच हे नियम मोडत असल्याचे वास्तव समोर आले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या घटनांमुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. विधीमंडळातील प्रतिनिधींनाच शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे का? काही महिन्यांपूर्वी पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत झालेल्या फ्री स्टाईल मारामारीनंतर सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त झाली होती. त्यानंतर अध्यक्षांनी कोणत्याही आमदार किंवा मंत्र्यासोबत विनापास व्यक्तींना अधिवेशनाच्या परिसरात प्रवेश न देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र या पार्श्वभूमीवरही नागपूर अधिवेशनात हेच नियम पायदळी तुडवले गेल्याचे तथ्य विधीमंडळ सुरक्षा पथकाने अध्यक्षांकडे सादर केलेल्या अहवालातून उघड झाले आहे.


अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवशीच एकूण १५ सदस्यांनी आपल्या सोबत असलेल्या व्यक्तींना पास नसताना विधीमंडळ परिसराजवळ नेल्याची नोंद सुरक्षा यंत्रणांनी केली. या सदस्यांमध्ये विधान परिषदेतील सत्ताधारी पक्षाचे तीन आमदार आणि विधानसभेतील १२ सदस्यांचा समावेश होता. या प्रकरणात एक कॅबिनेट मंत्रीही सामील असल्याची नोंद अहवालात आहे. विधान परिषद सदस्य परिणय फुके आणि योगेश टिळेकर यांनी पास नसलेल्या व्यक्तींना आत आणल्याचे सुरक्षा विभागाने स्पष्टपणे निदर्शनास आणले आहे. हा गोपनीय अहवाल अध्यक्ष आणि सभापतींकडे सुपूर्द करण्यात आला, त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी हा अहवाल सभागृहात वाचून दाखवून पहिल्या दिवसापासूनच नाराजी व्यक्त केली,


पहिल्या दिवसाच्या अनियमिततेवर प्रश्नचिन्ह उभे असतानाच दुसऱ्या दिवशी परिस्थिती आणखी गंभीर असल्याचे दिसून आले. एकूण आठ सदस्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत सोबत आलेल्या व्यक्तींना विनापास प्रवेश दिल्याचे नोंदवले गेले. यामध्ये आमदार राजू कोरमोरे यांच्या सोबत एक व्यक्ती, आमदार प्रकाश सुरवेंनी दोन व्यक्ती, आमदार महेश शिंदे व प्रवीण तायडे यांनी प्रत्येकी एक व्यक्ती, तसेच आमदार किशोर जोरगेवार आणि सिद्धार्थ खरात यांनीही एकेक व्यक्तीला आत घेऊन आले होते. याशिवाय मंत्री अशोक उईके यांच्यासोबत आलेल्या व्यक्तीचाही पास नसल्याचा अहवालात उल्लेख आहे. सुरक्षा पोलिसांनी हा दुसऱ्या दिवसाचा अहवालही अध्यक्षांकडे तातडीने सुपूर्द केला.

Post a Comment

0 Comments