मेळघाटातील कंत्राटी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संपावर असल्याने रोजगार हमी योजनेची (रोहयो) सर्व कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत धारणी तालुक्यातील रोजगार सेवकांच्या प्रतिनिधी मंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर करून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी केली.
तहसील कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान रोजगार सेवकांनी
रोहयोतील कामे बंद असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम उरले नसून त्यांच्या उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद पडल्याची गंभीर बाच मांडली अनेक गावांमध्ये गेल्या नोव्हेंबरपासून मजुरांना मजुरी मिळालेली नाही, नवी कामेही सुरू नसल्याने मजूर कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत.
स्थानिक मजुरांचे म्हणणे आहे की, "कामही नाही आणि मजुरीही नाही उपासमारीची वेळ आली आहे." होळीचा सण जवळ येत असताना घरात धान्य नसल्याने सण अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रोजगाराअभावी अनेक मजूर कुटुंबीयांसह मेळघाटाबाहेर स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. जंगलावर अवलंबून असलेल्या या भागातील लोकांसाठी रोहयो हेच उत्पन्नाचे मुख्य साधन असल्याने काम बंद पडल्याचा मोठा फटका बसत आहे. रोजगार सेवकांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पुढील मुद्दे प्रामुख्याने मांडले आहेत ज्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, रोहयोची कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत, मजुरांची प्रलंबित मजुरी तत्काळ वितरित करावी, होळीपूर्वी मजुरांना आर्थिक दिलासा द्यावा, या मागण्यांचा समावेश आहे.
तहसीलदारांनी या मागण्यांची नींद घेऊन संबंधित विभागांशी चर्चा करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
नोव्हेंबरपासूनची मजुरी अडकल्याने मेळघाटातील अनेक कुटुंबांना उधारीवर जगावे लागत आहे. सणासुदीच्या तोंडावरही पैसे उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या चितेत भर पडली आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर स्थलांतराचे प्रमाण वाढून मेळघाटातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Post a Comment
0 Comments