अल्पवयीन चिमुरड्या बालिकेवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय-१ चे न्यायाधीश श्री. आर. बी. रेहपाडे यांनी २० वर्षांच्या सश्रम कारावासाची सक्त शिक्षा तसेच ६,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
घटना १२ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी घडली. पीड़िता चक्कीवर दळण घेऊन जात असताना आरोपी प्रदीप बाबू कास्देकर (वय २८, रा. कुटंया, ता. धारणी) याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून मोटरसायकलवर जबरदस्ती बसविले व गावाबाहेरील जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
यावरून धारणी पोलिस ठाण्यात अपक्र, क्र. ४२६/२०२२ अंतर्गत कलम ३६३, ३७६, ३७७भा.दं.वि. व पोक्सो कायद्याच्या कलम ४ आणि ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रीना का. सदार यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड. डी. ए. नवले यांनी एकूण ११ साक्षीदारांची जबाबे नोंदवून आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर केले. फिर्यादी, पीडिता व इतर साक्षीदारांच्या साक्षीला न्यायालयाने ग्राह्य धरत गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले.
न्यायालयाने आरोपीस कलम ३७६ अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व ५,००० रुपये दंड (न भरल्यास तीन महिने सक्त मजुरी), कलम ३६३ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड (न भरल्यास एक महिना सक्त मजुरी) तसेच कलम ३७७ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड (न भरल्यास एक महिना सक्त मजुरी) अशी स्वतंत्र शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात पोलीस पैरवी पो.हे.कॉ. विनोद जांबेकर यांनी पाहिली. निकालानंतर सरकारी वकील अॅड. नवले यांनी न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत समाधान व्यक्त केले.

Post a Comment
0 Comments