शहरातील वाहतूक कोंडी, वेगवान वाहनचालक आणि रस्त्यांवरील वाढती धोकादायक परिस्थिती यामुळे दर्यापूर शहरात ट्राफिक सिग्नलची मागणी आता भीषण स्तरावर पोहोचली आहे. दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी एकाच दिवशी दोन स्वतंत्र अपघात झाल्याने संपूर्ण शहर हादरले असून, नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. दर्यापूरमधील बसस्टँड चौक, मूर्तिजापूर रोड चौक, बाभळी चौक, अंजनगाव टी पॉईंट चौक आदी परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही सिग्नल प्रणाली नसल्याने दररोज जीवघेणे प्रसंग घडत आहेत. अपघात मालिकेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा केला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की -"सरळ-सरळ सिग्नल बसवले असते तर हे दोन्ही अपघात टळू शकले असते. "वाहतूक पोलिसांची तात्पुरती उपस्थिती पुरेशी ठरत नाही, कारण वाहनसंख्या प्रचंड वाढली आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी व सामाजिक संघटनांकडून प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही आजतागायत कोणतीही कृती न झाल्याने नाराजी पसरली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील चौकांत सिग्नल नसल्याने विद्यार्थी, पादचारी आणि महिलांना दररोज जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. "आता तरी प्रशासन जागं होणार का?" हा प्रश्न आजच्या घटनांनंतर आणखी तीव्र झाला आहे नागरिकांनी स्पष्टपणे मागणी केली आहे. ट्राफिक सिग्नल बसवा! अपघात होऊन जीवितहानी झाल्यावर निर्णय घेऊ नका। दर्यापूरच्या सुरक्षिततेसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी आता चळवळीचे रूप घेऊ लागली आहे.

Post a Comment
0 Comments