अंजनगाव सुर्जी नगरपरिषद भाजपच्या निवडणुकीत नियोजनातील त्रुटी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील सर्वसाधारण जागेसाठी भाजपने दोन उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म दिले होते, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद मिटला.
प्रभाग १२ (ब) साठी सचिन रमेश जायदे आणि अजय हरीवल्लभपसारी या दोघांना भाजपने एबी फॉर्म दिले होते. एकाच जागेसाठी दोन अधिकृत उमेदवारांना फॉर्म मिळाल्याने शहरात विविध चर्चाना उधाण आले होते.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सखोल तपासणी केली. तपासणीनंतर सचिन रमेश जायदे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यामुळे अजय हरीवल्लभ पसारी यांची उमेदवारी कायम राहिली. अजय पसारी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज सचिन जायदे यांच्या अर्जाच्या एक दिवस आधी दाखल केला होता. जरी पसारी यांनी सुरुवातीला अर्जासोबत एबी फॉर्म जोडला नसला तरी, उमेदवारी दाखल केल्यानंतर एबी फॉर्म सादर करण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत मुभा असते. या नियमानुसार, पसारी यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला.
याउलट, सचिन जायदे यांनी एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला होता, परंतु निवडणूक नियमांनुसार एका जागेसाठी एकाच उमेदवाराचा अर्ज वैध ठरतो. त्यामुळे जायदे यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला.

Post a Comment
0 Comments