दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात लोकशाहीचा उत्सव साजरा झाला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. दर्यापूर नगरपालिकेत एकूण १२ प्रभाग असून २४ नगरसेवकांसह नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील प्रभाग क्रमांक २२ (अ) ची निवडणूक रद्द करण्यात आली असून, ती २० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रियेस सकाळी ७ वाजता सुरुवात झाली, यासाठी नगरपालिकेच्या निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली होती. शहरातील ३९ मतदान केंद्रांवर १५६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. सकाळी ११ वाजता अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा सहकार नेते सुधाकर भारसाकळे यांनी सुद्धा मतदान केंद्रांना भेट दिली. भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी तथा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नलिनी भारसाकडे यांनी स्वतः मतदान करून नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
दरम्यान, बाभळी येथील प्रभाग क्रमांक ८ मध्ये मतदानास सुरुवात करताना ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जवळपास तासभर मतदान प्रक्रिया रखडली होती. तसेच जुन्या दर्यापूर येथील महाराणा प्रताप शाळेतील मतदान केंद्रावरही ईव्हीएममध्ये तात्पुरता बिघाड झाला होता. मात्र निवडणूक विभागाने तातडीने उपाययोजना केल्याने मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली.
दर्यापूर, बनोसा आणि बाभळी या तिन्ही भागांत मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पडले. दर्यापूर नगरपालिकेच्या हद्दीत कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसून, निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात आले होते. या निवडणूकीलत एकूण ६८.६६ टक्के मतदान झाल्याची नोंद प्रशासनाने दिली आहे.

Post a Comment
0 Comments